*माझी इमेज..*

*इमेज माझी...*
     शीर्षक वाचताच अनेकांना स्वतःविषयी नक्कीच जाणीव झाली असेल. कारण प्रत्येक माणसाची एक "इमेज" असते. पण ती चेहऱ्याने, शरीराने किंवा परिस्थितीने ठरत नसते. ती घडते संघर्षाने, संस्काराने, विचाराने आणि कर्माने.
माझा जन्म ६ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. जन्मताच मी शारीरिकदृष्ट्या अपंग होतो. आयुष्याने पहिल्या श्वासापासूनच माझी परीक्षा सुरू केली होती. पण नियतीची सर्वात मोठी वेदना मला वयाच्या पाचव्या वर्षी मिळाली. माझा धाकटा भाऊ अवघा बारा दिवसांचा असताना सर्पदंशामुळे माझ्या आईचे निधन झाले.
आईच्या मायेचा स्पर्श, तिच्या कुशीत डोकं ठेवून रडण्याचा आधार, तिच्या हातचा घास आणि तिच्या प्रेमाची ऊब मला कधीच अनुभवता आली नाही. दोन वर्षांनी वडिलांनी आमच्या पालनपोषणासाठी दुसरा विवाह केला. संसार पुढे चालला, पण माझ्या आयुष्यातील "आई" ही जागा मात्र कायम रिकामीच राहिली. आजही कितीही मोठा झालो तरी मनाच्या एका कोपऱ्यात आईच्या मायेची ओढ तशीच आहे. अनेकदा मनात एकच प्रश्न उमटतो—"जर माझी आई आज असती, तर माझं आयुष्य किती वेगळं असतं?"
अपंगत्वामुळे शिक्षण हा माझ्यासाठी रोजचा संघर्ष होता. आठव्या वर्षी पहिलीत प्रवेश घेतला. डेहणे, अंबर्जे-शेई आणि नंतर डोलखांब येथे शिक्षण घेताना म्हशी चारल्या, मोलमजुरी केली, शेतीची कामे केली, रेती काढली आणि रोज दहा किलोमीटर पायी चालत शाळेत गेलो. शाळेत मात्र कधीही 100% जन्मतच कर्णबधिर असल्यामुळे गणित, इंग्लिश, या व इतर विषयांचा अभ्यास कधीच व्यवस्थित समजले नाही. माझं गुरु म्हणजे माझी पुस्तकं, नवनीत गाईड हिच ठरली.कारण सर्व पुस्तकं वाचुन तोंडपाठ करूनच व यासाठी अगदी रानात मोठ मोठ्याने आवाजात घोळवून नियमित मनन, चिंतन व रात्री आजीच्या निगराणी खाली 12/1 वाजेपर्यंत बत्तीच्या प्रकाशात घरात माळावर अभ्यास करूनच शिक्षण पूर्ण केले. कधीही परीक्षा मध्ये कॉपी केली नाही. लहानपणी परिस्थिती गरीब व आई नसल्याने  परिणामी खिशात एक-दोन रुपये असायचे; पण मनात लाखो स्वप्ने होती. त्याच जिद्दीच्या बळावर मी बारावीत वर्गात दुसरा क्रमांक मिळवला आणि पुढे बी.ए. व एम.ए. पूर्ण केले.
बालपणापासून रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजमहात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीरांची चरित्रे माझे गुरु बनली. आजी, आजोबा आणि वडिलांनी दिलेले संस्कार माझ्या आयुष्याचा भक्कम पाया ठरले.
२००६ साली जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य सेवक म्हणून सेवेत रुजू झालो. तेव्हापासून समाजातील गोरगरीब, आदिवासी आणि गरजू बांधवांची सेवा हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
माझा स्वभाव भावनिक, अध्यात्मिक, सहानुभूतीशील आणि प्रेमळ आहे. कोणाच्याही वाईटाचा विचार कधी केला नाही. चोरी, भांडण, फसवणूक, वाईट प्रवृत्ती किंवा चुकीची संगत यांच्यापासून मी नेहमीच दूर राहिलो आहे आणि पुढेही राहीन. माणसांची निवड करून मैत्री करणे मला आवडते. कारण माझ्यासाठी मैत्री ही स्वार्थाची नव्हे, तर विश्वास, संस्कार आणि माणुसकीची असते.
माझा चेहरा स्वभावतः गंभीर दिसतो. त्यामुळे अनेकांना पहिल्या भेटीत मी कठोर किंवा अबोल वाटतो. पण प्रत्यक्षात मी तसा नाही. माझ्या मनात माया आहे, प्रेम आहे, सहानुभूती आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखाने व्याकूळ होणारे हृदय आहे. जे मला जवळून ओळखतात, तेच माझ्या मनाचा खरा चेहरा पाहू शकतात.
आजही अनेक लोक माझ्याकडे फक्त "अपंग" म्हणून पाहतात. माझ्या व्यक्तिमत्त्वाकडे, संघर्षाकडे आणि कामाकडे न पाहता माझ्या शरीराकडे पाहून मत बनवतात. हा अनुभव आजही मला अनेक वेळा येतो. ही वेदना शब्दांत सांगणे कठीण आहे.
पण याच जगात काही मोजकी माणसे अशी आहेत, ज्यांनी माझ्या अपंगत्वाकडे नाही तर माझ्या मनाकडे, माझ्या प्रामाणिकपणाकडे आणि माझ्या संघर्षाकडे पाहिले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला सन्मान दिला आणि प्रत्येक कठीण प्रसंगी निःस्वार्थ साथ दिली. आज मी जिथे उभा आहे, तिथपर्यंत पोहोचण्यात त्या ठराविक व्यक्तींचा मोठा वाटा आहे. त्यांचे ऋण मी आयुष्यभर मानत राहीन.
आज माझ्याकडे पद आहे, अनुभव आहे, समाजाचा सन्मान आहे; पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आईच्या मायेची उणीव आहे. काही जखमा काळ भरून काढतो, पण काही जखमा आयुष्यभर आपल्यासोबत जगतात. माझ्यासाठी आईची आठवण ही अशीच एक जिवंत वेदना आहे.
माझी खरी इमेज माझ्या अपंगत्वात नाही... ती माझ्या संघर्षात आहे.
माझी ओळख माझ्या मर्यादांमध्ये नाही... ती माझ्या जिद्दीत आहे.
माझे व्यक्तिमत्त्व माझ्या चेहऱ्यात नाही... ते माझ्या विचारांत, संस्कारांत आणि समाजसेवेत आहे.
कारण...
"शरीरावरची मर्यादा माणसाला लहान करत नाही; विचारांची उंची, चारित्र्याची ताकद आणि माणुसकीची श्रीमंतीच त्याची खरी ओळख घडवते. माझी इमेज माझ्या अपंगत्वाची नाही, तर माझ्या संघर्षाची आहे."
   श्री हरिश्चंद्र कृष्णा हरड.
मु वरपडी पोस्ट गुंडे तालुका शहापूर जिल्हा ठाणे. 🙏

Comments

Popular posts from this blog

आदिवासी दिन निम्मित

*💖माझी कर्मभूमी वरपडी गाव --एक निसर्ग रम्य ठिकाण.💖